आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ ||

ते जीव जाळत उपोषण करत बसले
हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले
जरा जास्त झालं की लाठीखाली घ्यायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || १ ||

समित्यांवर समित्या बैठकावर बैठका
हा अहवाल तो अहवाल असंच फक्त करायचं
सकारात्मकतेचा डोस देत राहायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || २ ||

मराठ्यांच्या भविष्यासाठी एक योद्धा लढतोय
झाले चौदा दिवस रोज तीळ तीळ तुटतोय
मराठयांच्या आकांताला समजून नाही घ्यायचं
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || ३ ||
© राजेश खाकरे
मो.7875438494
एक मराठा लाख मराठा

होतं असं..!

होतं असं...

कधी कधी नेम चुकतो, होतं असं
धनुष्याचा बाण चुकतो...होतं असं

आपलच असतं एरव्ही सगळं काही
वेळ पडता सगळं संपतं... होतं असं

पालन पोषण करून मोठा होतो मुलगा
बापावरतीच हात उगारतो... होतं असं

डोळ्यादेखत आपल्या कधी पडतो दरोडा
आपण नुसते बघत राहतो... होतं असं

सत्यापेक्षा सत्तेचा दबदबा ज्यादा
लोकशाही केविलवाणी होते...होतं असं

सगळे हुंकार कागदावरती उमटत नाही
सगळं- सगळं सांगत नाही कविता... होतं असं
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४





घरकूल

◆◆◆
गेल्या 8 महिन्यापासून तो ग्रामपंचायत ऑफिस मध्ये येऊन चौकशी करतो आहे, त्याला घरकूल मंजूर होते की नाही म्हणून

त्याच्या घराच्या पोपडे आलेल्या मातीच्या भिंती कोणत्याही क्षणी कोसळतील,
त्याच्या घराचे छत पावसाळ्यात तग धरत नाही, आणि घरात साचते तळेच- तळे
तिकडच्याच कुठल्याशा ओल्यासुक्या कोपऱ्यात काढते रात्र त्याचे अख्खे कुटुंब
मी बघितले आहे, त्याच्या घराच्या सारवलेल्या भिंती घुशीने पोखरलेल्या आहेत. आणि कोपऱ्या- कोपऱ्यात मातीचे ढीग साचलेत

त्याच्या दोन एकर शेतीत दहा पंधरा हजारांचे उत्पन्न निघते वर्षाला कसेबसे
म्हणून तो जातो मोलमजुरीने त्याच्या बायकोसोबत.

एके दिवशी बायकोसोबत मोलमजुरीला जातांनी मला भेटला तो त्याच्या नेहमीच्या रस्त्यावर
म्हणाला "साहेब, आपल्या घरकुलावर लक्ष ठेवा बरं.. खूपच गरज आहे आम्हांला, तुम्ही एकदा येऊन बघा ना आमचे सध्याचे घर"

मी एके दिवशी वेळ काढून गेलो तो राहतो तिथल्या शेतावरच्या घरी.
तो दाखवत राहिला त्याच्या गरिबीची लक्तरे,
मधून मधून गाळत राहिला आसवे.

मी बघितले आणि माझे मलाच वाईट वाटले.
तुम्हांला लवकरच घरकूल मिळण्यासाठी प्रयत्न करू असे सांगून आलो त्याला.
पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या घरकुलाच्या यादीत त्याचे नाव 44 नंबरला आहे, निदान अजून 4 वर्ष तरी लागतील त्याला घरकूल यायला
काल तो लगबगीने आला माझ्याकडे.
"साहेब मी ऐकलं की, आणखी 300 घरकुलं मजूर झाले म्हणून?"
"हो झालीत की"
"कोणा-कोणाला मिळणार आहेत?"
"महाराष्ट्रातल्या 300 आमदारांना घरकूल मिळणार आहेत."
" म्हणजे साहेब, ते माझ्यापेक्षाही गरीब आहेत?"

मी काहीच बोललो नाही. 'मी शासकीय कर्मचारी आहे. शासकीय कर्मचाऱ्याने शासन धोरणाविरुद्ध बोलायचे नसते!' मी मनातल्या मनात म्हणालो.
© राजेश खाकरे
२६ मार्च २०२२

फोटो उगीचच कुणाचा

नको टाकू मित्रा, फोटो उगीचच कुणाचा
वरच्या ओळी वाचुस्तोवर धडधड काळजात होते
© राजेश खाकरे

कदाचित देवा..!

कदाचित देवा..!
काल परवा-परवा पर्यंत जिवंत असलेल्या व्यक्तीला
आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना थरकाप होतोय काळजाचा
भीती मरणाची नाही वाटत. भीती वाटते ते मरण ज्या पद्धतीने येत आहे त्याची.
जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे हे ऐकत आलो होतो,
पण तो उद्या, परवा केव्हाही जाऊ शकतो, हे खूपच भयंकर आहे ना..!
गेल्या दीड वर्षांपासून तोंड बांधून बांधून आणि हाताला फवारे मारून मारून पार कंटाळा आलाय देवा,
जगण्यात मौज नाही राहिली, जगणं भीतीच्या सावटाखाली पार दबून गेलंय..!
कोणाची ऑक्सिजन लेव्हल किती ठेवायची आणि कोणाचा स्कोअर कसा असावा, याचा हिशोब तुझ्याकडेच होता देवा;
तो आमच्याकडे नकोच देऊ..!
चूक तुझी नाहीच देवा, चुका आमच्याच...
ताजातवाना ऑक्सिजन देणारी झाडे आम्ही कराकरा कापून टाकली... आणि उभारत गेलोय सिमेंटची जंगलं..!
तू माणूस म्हणून आम्हाला जन्माला घातलं आणि आमच्यात थोडी माणुसकी ओतलीस..
पण देवा त्या माणुसकीची वाफ होऊन उडून गेली आता..!
आता आम्ही नुसती माणसे आहोत... भेसळयुक्त माणसे... आम्ही आता शुद्ध नाहीतच... सगळ्यात भेसळ केली...करतो आम्ही...
तू बघितलं असेलच परवा-परवा आम्ही इंजेक्शनातही काळाबाजारी केली.. आम्ही कुणालाच आणि कशालाच सोडत नाही.
म्हणूनच कदाचित तू आमच्यावर रागावला असावा...! तुला वाटलं माणसे सुधारतील..! पण माणसे सुधारणार नाहीत देवा...!
पण देवा, तू तर देव आहेस ना, आमच्यावर रागव, आम्हांला अद्दल घडव, पण आता हे थांबव आणि आम्हांला मोकळा श्वास घेऊ दे! एक संधी पुन्हा दे, कदाचित आम्ही माणुसकी रुजवण्याचा प्रयत्न करू! कदाचित आम्ही ही वसुंधरा जपण्याचा प्रयत्न करू!!!
© राजेश खाकरे
मो.7875438494

निंदक नियरो राखियो...

आपण धोब्याची पर्वा करायची नाही. धोबी म्हणजे जातीचा धोबी नाही तर धुणारा. श्रीरामाने धोब्याची पर्वा केली आणि पुढे काय झाले आपल्याला माहितच आहे. हा धोबी प्रतिकात्मक आहे. आपण धुणाऱ्याला त्याचे काम करू द्यायचे. आणि तो आपल्याला स्वच्छ करतो म्हणून मनातल्या मनात त्याचे आभार मानायचे! कबीरदासांनी म्हटलेच आहे "निंदक नियरो राखियो..."
©राजेश खाकरे
१७ मार्च २०२१
#सूर्योदय

दोन ओळी

घाबरला तो, हातून त्याच्या दुष्कर्म घडता;
सामान्य वाटला, बहुदा तो मंत्री नसावा!
© राजेश खाकरे

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...